प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धुंद वारे, नको चांदण्या या

नको पारिजाता धरा भुषवू ही
पदांची तिच्या आज चाहूल नाही
प्रियेविण आरास जाईल वाया

फुले सान झेलू, तरी भार होतो
पुढे वाट साधी, तरी तोल जातो
कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या

न शांती जिवाला, न प्राणास धीर
कसा आज कंठात येईल सूर
उरी वेदना मात्र जागेल गाया

अता आठविता तशा चांदराती
उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती
उशाला उभी ती जुनी स्वप्नमाया
 
 
गीत - यशवंत देव
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - सुधीर फडके
राग - कलावती, जनसंमोहिनी (नादवेध)
For the printable version of this song, click here.
   
  Prabhakar Jog
  Prabhakar Jog
  Courtsey -
Prabhakar Jog,
Pune