त्या तरुतळी विसरले गीत
हृदय रिकामे घेउनि फिरतो, इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना
स्वरातुनी चमकते वेदना
तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत

विशाल तरु तरी फांदी लवली
थंडगार घनगर्द सावली
मनिंची अस्फुट स्मिते झळकती, तसे कवडसे तीत

मदालसा तरुवरी रेलुनी
वाट बघे सखी अधिर लोचनी
पानजाळि सळसळे, वळे ती, मथित हृदय कवळीत

पदर ढळे, कचपाश भुरभुरे
नव्या उभारित ऊर थरथरे
अधरी अमृत उतू जाय परि, पदरी हृदय व्यथीत

उभी उभी ती तरुतळि शिणली
भ्रमणी मम तनु थकली गळली
एक गीत, परी चरण विखुरले, द्विधा हृदय-संगीत
 
 
गीत - वा. रा. कांत
संगीत - यशवंत देव
स्वर - सुधीर फडके
राग - चंद्रकंस (नादवेध)
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.