गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट

अजाणता मी पथिक एकटा
झांजड पडली, लपल्या वाटा
अवतीभवती किर्रर्र दाटले काटेबन घनदाट

दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा, नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी, लोचन काठोकाठ

भुकेजले मी, तहान लागे
पुढे जाऊ की परतू मागे
सांजेपाठी सुदीर्घ रजनी, दिसणे कुठून पहाट

क्षणभंगुर हे जीवन नश्वर
नेतिल लुटुनी श्वापद तस्कर
ये श्रीदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - गुरुकिल्ली (१९६६)
For the printable version of this song, click here.