काय ऐकिले, काय पाहिले, काय पुढे आता
जिण्याची झाली शोककथा

मी भूमीवर जगतो आहे अथवा पाताळी
डोळ्यांपुढती दुनिया झाली तमाहुनी काळी
तनामनावर घाव घालिते एक अनामी व्यथा

अजुनी कानी कढते आहे निंदांची वाणी
वाफ हो‍उनी उडुनी गेले डोळ्यातिल पाणी
मला गिळाया गर्जत आला आठवणींचा जथा

विसर पडावा या दुःखाचा ही आशा मोठी
विस्मृतिचा हा पेला जाणुन लावियला ओठी
उपाय म्हणून अपाय बसलो कवटाळुनी मी वृथा

शुद्ध हरपली तरीहि राही जिवंत जाणीव माझी
लेप लाविता जळे औषधी जखम पुन्हा जाळी
चालणेच मज अशक्य झाले शोधू कैसा पथा
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - दैवाचा खेळ (१९६४)
For the printable version of this song, click here.