रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
मज वेड लावले तू, सांगू नको कुणाला !

एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला,
ऐकून लाजले मी सांगू नको कुणाला !

चंद्रा, ढगांतुनी तू हसलास का उगा, रे ?
वाकून खालती अन्‌ का ऐकलेस सारे ?
जे ऐकले तुवा ते, सांगू नको कुणाला !

वा-या, तुझी कशाने चाहूल मंद झाली ?
फुलत्या फुला, कशाला तू हसलास गाली ?
जे पाहिले तुवा, ते सांगू नको कुणाला !

हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून
पाण्या, अशीच ठेवी छाया उरी धरून
धरलेस जे उरी ते, सांगू नको कुणाला !

हा लाजरा शहारा पाहील काय कोणी ?
करतील का चहाडी हे गाल लाल दोन्ही ?
गालात रंगले जे, सांगू नको कुणाला !
 
 
गीत - डॉ. वसंत अवसरे (शांता शेळके )
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - अवघाचि संसार (१९६०)
राग - तिलककामोद, देस (नादवेध)
 
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.