आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा

घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुन या सरिता, सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा
 
 
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - आराम हराम आहे (१९७६)
राग - यमन, तिलककामोद, देस (नादवेध)
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.