बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे यांशी गोष्टी करू

बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकुया त्या भुंग्यांचा,
फुलाफुलांचे रंग दखवील फिरते फुलपाखरू

हिंडू ओढे, धुंडू ओहळ, झाडवरचे काढू मोहळ,
चिडत्या, डसत्या मधमाश्यांशी, जरा सामना करू

हलवू झाडे चिटबोरांची, पिसे शोधुया वनि मोरांची,
माळावरची बिळे, चलारे काठीने पोखरू

सुग्रण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे बेडकिचे लेकरू

कसा जोंधळा रानी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो,
खबदाडितल खजिना त्याचा फस्त खाऊनी करू

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू,
मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - चिमण्यांची शाळा ( १९६२)
For the printable version of this song, click here.