लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही

पिसे, सनतडी, काड्या जमवी, चिमणी बांधी कोटे
दाणा, दाणा आणून जगवी, जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडूनी जाई

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही

माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन्‌ सद्भावा
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - जिव्हाळा (१९६८)
For the printable version of this song, click here.