आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे !

भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतुन साकार जाहले, तुझ्यामुळे !

परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते परी कुंचले
रंगांतुन त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे !

करात माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतुन झंकार उमटले, तुझ्यामुळे !

हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिरि परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - कलंकशोभा (१९६१)
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.