नकळत होते तुझी आठवण !

कळ्या फुलांना हळुच हसविते
प्रेमळ निर्मळ उषा उगवते
दिवसाचे ते बघुन बालपण
नकळत होते तुझी आठवण !

हास्याचा कल्लोळ भोवती
भोजन करिता भरल्या ताटी
घास अडकता उचकी लागुन
नकळत होते तुझी आठवण !

सरे प्रीतिचे स्वप्न कोवळे
दोन सानुले विहग पांगले
चित्रपटांतिल प्रसंग पाहुन
नकळत होते तुझी आठवण !

करुनि जागरण कलिका सुकली
म्लान मुखाने घरी निघाली
चंद्रकोर गगनातिल देखुन
नकळत होते तुझी आठवण !
 
 
गीत - शांताराम आठवले
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट -
For the printable version of this song, click here.   
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.