बाळ गुणी तू कर अंगाई
जोजविते रे, तुजला आई !

तुझा चंदनी लाल पाळणा
जाईजुईचा मऊ बिछाना

झुलती वरती राघूमैना
मागेपुढती झोका जाई

बाळ गुणी तू कर अंगाई !

निजले तारे, निजले वारे
शांत झोपली रानपाखरे

जग भवती निजले सारे
चंद्रहि करतो गाई गाई
बाळ गुणी तू कर अंगाई !

मंद पाउली येते रजनी
शिणले डोळे जागजागुनी

अजुन मिटेना कशी पापणी ?
निज, लडिवाळा, निज लवलाही
बाळ गुणी तू कर अंगाई !
 
 
गीत - शांता शेळके
संगीत - राम कदम
स्वर - सुमन कल्याणपूर, सुधीर फडके
चित्रपट - भाग्यलक्ष्मी (१९६२)
For the printable version of this song, click here.
  Follow Aathavanitli Gani on twitter. Join to blog, comment, etc.