सामर्थ्याहून समर्थ निष्ठा, अशक्य तिजसी काय ?
पडे अहल्या शिळा त्यास्थळी, येतील प्रभूचे पाय

कधी मी पाहीन ती पाऊले

पाहीन केव्हा तो सोहळा, प्रभू चरणांचा स्पर्ष कपाळा
आनंदाश्रू झरतील डोळा, भाग्यच माझे दिसेल मजसी
मूर्त उभे ठाकले

रणात जिंकून कौरव सेना, यश सिद्धीच्या करीत गर्जना
अभये अर्पीत साधू सज्जना, पाच प्राणसे येतील पांडव
विजयाने न्हाले

मारुनी रावण कपटी कामी, अशोकवनी या येतील स्वामी
वाहणार हे कधी प्राण मी, भेटीसाठी अशा अलौकीक
कालचक्र थांबले

देवाहूनही समर्थ भक्ती, स्वरात माझ्या अमोघ शक्ती
सुफलीत व्हाया माझी युक्ती, पंच कन्यका अर्पण करिती
पुण्य मला आपले
 
 
गीत - ग. दि, माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सुवासिनी (१९६१)
For the printable version of this song, click here.